राज्यात १० दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात १० दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना अलर्ट

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने महाराष्ट्राच्या हवामानात लक्षणीय बदल होणार आहेत. यामुळे राज्यात २१ ते ३१ मे दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

२१ ते २४ मे दरम्यान कोकण, मुंबई, तसेच मध्य व दक्षिण महाराष्ट्रात गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत जाऊ शकतो. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने २२ मेपासून कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होईल आणि त्याचा राज्यभर मोठा परिणाम जाणवेल, असा इशारा दिला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा परिणाम जाणवेल.

या पावसामुळे राज्यातील हवामानात बदल होऊन, दिवसाचे कमाल तापमान व पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल आणि ६ जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र त्याआधीच पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी अत्यंत सतर्क राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यात सुमारे २७,००० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीत १३,००० हेक्टर आणि नाशिकमध्ये ५,८५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. नुकसानग्रस्त भागांमध्ये तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment