महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट – IMD चा इशारा

महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, सहा जिल्ह्यांना हाय अलर्ट – IMD चा इशारा

सध्या देशातील अनेक भागांमध्ये प्रचंड उन्हाची लाट जाणवत आहे. तापमानात मोठी वाढ झाल्याने रस्ते ओस पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशभरात जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पूर्व राजस्थान, पश्चिम व पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यांचा वेग 50-60 किमी प्रति तास इतका असणार आहे. तसेच हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः विदर्भातील भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग 40-50 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना फटका, नागरिकांना दिलासा

या संभाव्य पावसामुळे शेतीच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. मात्र दुसरीकडे, वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानाच्या बदलत्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment