Maharashtra Rain Alert : येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात १०० ते १५० मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे. काही ठिकाणी १०० ते १५० मिमी पाऊस पडू शकतो.
सध्या राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली असून, उत्तर कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीवर याचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वाऱ्याच्या जोरासह पाऊस पडू शकतो.
पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत ४० ते १२० मिमी पावसाची शक्यता आहे. घाटाच्या लगतच्या भागांमध्ये पावसाच्या सरी अधिक तीव्र असू शकतात. यामुळे नद्या आणि नाल्यांचे पाणी पातळी वाढू शकते आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाचा धोका असल्याने अनावश्यक प्रवास टाळावा, असेही सांगितले आहे. काही भागात विजा चमकत जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत पावसाची हजेरी
बुधवारी रात्री ११ नंतर मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. परळ, वरळी, दादर, बोरिवली, कुर्ला आणि नवी मुंबईत जोरदार पावसाची नोंद झाली.
राज्यातील पावसाचा प्रभाव
गेल्या तीन दिवसांत राज्यात वळीवाचा जोर वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत अतिवृष्टी झाली असून, काही ठिकाणी पाणी साचले आहे आणि पिकांचं नुकसानही झालं आहे.
मोसमी वाऱ्यांची स्थिती
नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, श्रीलंकेचा मोठा भाग व्यापत आहेत. येत्या काही दिवसांत हे वारे केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मोसमी वारे वेळेपेक्षा पाच दिवस आधी दाखल झाले आहेत.
आज कुठे पाऊस पडणार?
- गडगडाटासह वादळी पाऊस – मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर
- मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर
- सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस – अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम, यवतमाळ