१६ जूनपासून शाळेच्या वेळापत्रकात मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येत्या शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात येणार आहे.
सध्या राज्यातील विद्यार्थी उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत आहेत. यंदा सुट्टी थोडी उशिरा लागली असली तरी शैक्षणिक वर्षाची सुरुवात नेहमीप्रमाणेच 15 जूनपासून होईल आणि नियमित शाळा 16 जून 2025 पासून सुरू होतील. मात्र, विदर्भातील शाळा उष्णतेमुळे काहीसा उशिरा सुरू होतील आणि सुरुवातीच्या काळात फक्त सकाळच्या सत्रातच भरतील. तापमान आटोक्यात आल्यानंतरच त्या नियमित वेळेनुसार चालू होतील.
या बदलामागचं कारण म्हणजे राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या धोरणामुळे शाळांचे वेळापत्रकही नव्याने ठरवले गेले आहे.
नवीन वेळापत्रकानुसार शाळेचा दिवस पुढीलप्रमाणे असणार आहे:
- शाळा सकाळी 9:00 वाजता सुरू होईल.
- 9:00 ते 9:25 पर्यंत परिपाठ होईल.
- 9:25 ते 11:25 या वेळेत तीन तासिका घेतल्या जातील.
- 11:25 ते 11:35 ही लहान सुट्टी असेल.
- 11:35 ते 12:50 या वेळेत पुढील दोन तासिका होतील.
- 12:50 ते 1:30 ही मोठी सुट्टी राहील.
- 1:30 ते 3:55 या वेळेत उर्वरित तासिका घेण्यात येतील.
- शेवटच्या पाच मिनिटांमध्ये “वंदे मातरम” घेतले जाईल आणि त्यानंतर शाळा सुटेल.
या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच विश्रांतीसाठी वेळ मिळणार असून, शाळेच्या दिनचर्येत अधिक शिस्तबद्धता येण्याची अपेक्षा आहे.