पुढील 24 तास वादळी पाऊस, ऊन-वाऱ्याचे… पाहा तुमच्या भागात हवामानाचा नेमका काय अंदाज IMD Rain Alert update
IMD Rain Alert update : केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं देशभरातील हवामानाचा आढावा घेत काही प्राथमिक अंदाज व्यक्त केले आहेत. जिथं महाराष्ट्रावरही कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्याचे परिणाम होत राज्यावर पावसाचं सावट असेल असा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवललेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रास आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे.
तापमानवाढ अन् मेघगर्जना…
पुढील काही दिवसांसाठी राज्याच्या बहुतांश भागांना पावसाचा इथारा देण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला असताना त्यातच मेघगर्जना आणि वादळी पावसाचा मारा राज्याच्या बहुतांश भागांवर होऊ शकतो असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची हजेरी?
5 ते 7 मे दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपिटीची शक्यता
6 ते 7 मे दरम्यान अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये पावसाची शक्यता
6 ते 7 मे या दिवसांमध्ये मुंबईत पावसाची शक्यता
5 मे रोजी विदर्भात गारपीटीची शक्यता
7 मे रोजी मराठवाड्यावर पावसाचा मारा
इथं वाढत्या तापमानातच वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळत असताना दुसरीकडे कोकण आणि राज्याच्या इतर किनारपट्टी भागामध्ये सरासरी तापमान 34 ते 35 अंशांदरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यावर गारपिटीचं गंभीर सावट
सध्याच्या घडीला गुजरातवर वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. ज्या कारणास्तव पुढील पाच दिवस राज्यात उन्हाळी पावसाचा जोर राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
याचदरम्यान बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार गुजरात आणि छत्तीसगड येथील वाऱ्याच्या स्थितीमुळं कोकण वगळता उर्वरित राज्यावर गारपिटीसह अवकाळीचं गंभीर सावट पाहायला मिळत आहे.